Sunday, September 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गणेशमूर्तीवर सोड्याची बाटली फेकल्याप्रकरणी वृद्धाला अटक

गणेशमूर्तीवर सोड्याची बाटली फेकल्याप्रकरणी वृद्धाला अटक

झारणी रोडवरील प्रकार; धार्मिक भावना दुखावल्याचा तक्रारीत आरोप

रत्नागिरी:- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तीवर सोड्याची बाटली फेकून मारल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका वृद्ध संशयिताला अटक केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील झारणी रोड परिसरात घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शमशूद्दीन अब्दुल मुजावर (वय ७०, मूळ रा. कवठे पिराण, ता. मिरज, जि. सांगली; सध्या रा. झारणी रोड, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी सागर चक्रधर दळी (वय ४५, रा. डी.एस.पी. बंगल्यामागे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दळी हे आपल्या नातेवाईकांसह घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी मिरवणुकीने जात होते. मिरवणूक झारणी रोड येथील जामा मस्जिदसमोर आल्यानंतर संशयित मुजावर याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून मिरवणुकीच्या दिशेने एक सोड्याची बाटली फेकली. तक्रारीनुसार, ही बाटली गणेशमूर्तीवर जाऊन आदळली. बाटलीला दारूसदृश वास येत होता तसेच त्यावर मांसाहारी पदार्थ लावलेला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर संशयिताने फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांकडे हातवारे करून चिथावणीखोर हावभाव केले तसेच त्यांच्यावर हसून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने दखल घेत संशयिताला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम १९६ (२), २९९ आणि ३०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संशयिताला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका सुरू असताना हा प्रकार घडल्याने पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. कोणत्याही अफवा किंवा गैरसमजावर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.