Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणपतीपुळेत आज उसळणार भक्तांचा महापूर

गणपतीपुळेत आज उसळणार भक्तांचा महापूर

उन्हाळी सुट्ट्यांसह अंगारकी चतुर्थीचा योग

रत्नागिरी:- जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात मंगळवार दिनांक पाच एप्रिल रोजी अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सवाचा योग जुळून आल्याने भाविक पर्यटकांची मोठी गर्दी उसळणार अंदाज वर्तवण्यात आला आहे.या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या वतीने अतिशय चोख नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी भाविक व पर्यटकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले होणार आहे.

त्यामध्ये प्रारंभी गणपती मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प, व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे .या अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सवासाठी भाविकांना यांच्या मंदिरात दर्शनाची सोय अतिशय सुलभ व्हावी याकरिता देवस्थान समितीकडून मंदिर परिसरात दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. या दर्शन रांगांच्या ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय, उन्हापासून भाविकांच्या संरक्षणासाठी छप्पर व्यवस्था, दर्शन रांगांवर सुरक्षिततेसाठी देवस्थानचे सुरक्षारक्षक, रत्नागिरी येथील श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टचे स्वयंसेवक व पोलीस कर्मचारी आदींचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सुमारे दीडशे पोलीस कर्मचारी आपला पोलीस बंदोबस्त बजावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख १७ पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गर्दीच्या ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या अंगारकी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे मंदिर सभागृहात गेल्या चार दिवसांपूर्वी तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचे वतीने विशेष नियोजनात्मक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले भाविक व पर्यटकांना कुठल्याही गैरसोयी जाणवणार नाहीत या दृष्टीने दृष्टीने देवस्थान समिती,ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे. भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलिस यंत्रणेकडून भाविकांच्या वाहतुकीची पार्किंग व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त बजावला जाणार आहे. या अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सवासाठी घाट माथ्यावरील कोल्हापूर ,सांगली, सातारा, इचलकरंजी, कराड, मिरज, कवठेमहाकाळ आदी ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच यंदा मे महिन्यातील उन्हाळी पर्यटन हंगामात अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सव जुळून आल्याने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . गणपतीपुळे देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा, आरोग्य व महावितरण यंत्रणा तसेच अन्य संबंधित सर्व यंत्रणा सज्ज राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंगर की चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे परिसरात कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही आणि विशेषत: समुद्र स्नान करताना कुठलीही दुर्घटना घडणार नाही या दृष्टीने विशेष खबरदारी घेऊन पोलीस गस्त ठेवली जाणार आहे . तसेच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भाविक व पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन गणपतीपुळे ग्रामपंचायतचे एकूण सहा जीवरक्षक कार्यरत राहणार आहेत . एकूणच अंगारकी यात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून सुमारे 60 ते 70 हजार पेक्षा अधिक भाविक स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी हजेरी लावतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, या अंगारकी यात्रा उत्सवासाठी घाट माथ्यावरील अनेक दुकानदार दाखल झाले असून या यात्रा उत्सवात भाविकांना श्रींच्या दर्शना बरोबर च आपल्या विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. चौकट: भाविक व पर्यटकांच्या सेवेसाठी देवस्थानची रुग्णवाहिका: दरम्यान ,अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक व पर्यटकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन आरोग्याच्या तक्रारी किंवा अन्य समस्या उद्भवल्यास तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थानची रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. चौकट: सायंकाळी स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक:- या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे वतीने सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक भव्य दिव्य स्वरूपात मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे काढण्यात येणार आहे .यावेळी ढोल ताशांचा गजर, फटाक्याची आतषबाजी आणि मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष अशा स्वरूपात स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक विशेष लक्षणीय ठरणार आहे.या मिरवणुकीत देवस्थानचे सरपंच व सर्व पंचमंडळी, मुख्य पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ ,पोलीस कर्मचारी, भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.