रत्नागिरी:- कोकणची पंढरी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला आहे. वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असल्याने आणि त्यातच मंगळवारी हा दुर्मिळ योग आल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक ‘बाप्पा’च्या दर्शनासाठी गणपतीपुळे येथे दाखल झाले आहेत.
अंगारकीनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. आज पहाटे ३.३० वाजल्यापासून श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली. पहाटेच्या मंगलमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण समुद्रकिनारा आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे.
अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागू नये यासाठी विविध ठिकाणी रांगांचे नियोजन केले आहे. नारळबाग परिसर येथे सर्वाधिक ३७ दर्शन रांगा लावण्यात आल्या आहेत. पार्किंग परिसरात भाविकांच्या सोयीसाठी येथे ९ स्वतंत्र रांगांची व्यवस्था आहे. मंदिर व रेस्ट हाऊस येथे मधल्या भागात ३ रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरापासून काही किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा गेल्या असून, सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक तैनात आहेत.
आजच्या विशेष योगामुळे मंदिर प्रशासनाने १८ तास दर्शन व्यवस्था खुली ठेवली आहे. रात्री १०.३० वाजेपर्यंत भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. दिवसभरात सुमारे १.५ लाख भाविक दर्शनाचा लाभ घेतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२६ हे वर्ष गणेश भक्तांसाठी अत्यंत खास असणार आहे. या वर्षी एकूण तीन वेळा अंगारकी चतुर्थीचा योग येणार आहे, त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
गणपतीपुळ्याचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बाप्पाचे जागृत देवस्थान यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. मात्र, अंगारकीच्या निमित्ताने आज संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण आहे. रत्नागिरीसह सांगली, कोल्हापूर, सातारा आणि मुंबई-पुण्याहून मोठ्या संख्येने खासगी वाहने आणि एसटी बसने भाविक येथे दाखल झाले आहेत.









