चिपळूण:- तालुक्यातील खेर्डी बाजारपेठेत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ‘मिलन डे’ नावाच्या मटका जुगार अड्ड्यावर चिपळूण पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार चालवणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेर्डी बाजारपेठेतील जंगम वडापाव सेंटरच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विलास सखाराम मिरगल ( ५५, रा. खेर्डी बाजारपेठ) हा बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे स्वीकारून ‘मिलन डे’ नावाचा मटका जुगार चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग शिवराम जवरत आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ५ वाजता या ठिकाणी छापा टाकला. यावेळी विलास मिरगल हा मटक्याचे आकडे घेताना रंगेहाथ आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य असा एकूण १०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विलास मिरगल याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.