खेडशी येथे दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी येथे दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नतेज सुभाष कांबळे (26, सोमेश्वर बौद्धवाडी, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा घेऊन खेडशी लोहारवाडी ते खेडशीनाका असा मुख्य रस्त्याने प्रवास करत होता. मात्र याचवेळी ममता मधुकर सावंत (50, खेडशी बौद्धवाडी) या शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. खेडशी तिठा येथे चालत जात असताना रस्त्यात भेटलेल्या स्वप्नतेज कांबळे यांच्याकडे त्यांनी लिफ्ट मागितली. त्यानंतर स्वप्नतेज कांबळे यांच्या दुचाकीवरून खेडशी तिठा येथे जात असताना गोपाळ जनरल स्टोअरच्या समोर त्या दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत पोलीस हवालदार संतोष कांबळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्वप्नतेज याच्यावर भादवी कलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.