खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणाला अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा

मारहाणीच्या भीतीने पळ काढताना दिली वाहनांना धडक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणाने आपल्याला मारहाण होईल या भीतीतून कारमधून पळ काढताना कारवांचीवाडी येथील काही वाहनांना धडक देत अपघात केला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली असून संशयित तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा तरुण खेडशी येथील राहणारा असून तो ज्या तरुणीचा पाठलाग करत होता ती सुध्दा खेडशी परिसरातीलच रहाणारी आहे. तो तिचा सातत्याने पाठलाग करत होता. याबाबत तिने आपल्या आई-वडिलांना माहिती दिली होती. दरम्यान,शुक्रवारी रात्री अल्पवयीन मुलीच्या पालकांनी संशयिताला धडा शिवण्याचा निश्चय केला होता. ही बाब संशयिताच्या लक्षात येताच त्याने खेडशीतून धूम ठोकली होती. आपल्याला मारहाण होईल या भितीने तो बेदरकारपणे कार चालवत असतान त्याने कारवांचीवाडी येथील काही गाड्यांना ठोकर देत अपघात केला. दरम्यान, पिडीतेच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्या संशयिताला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.