२१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस
रत्नागिरी:- खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगरमधील ‘कृष्णकुंज’ बंगल्याला कुलूप बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद गणपत विचारे (वय ६२, रा. डोंबिवली, मूळ रा. खेडशी, रत्नागिरी) हे आपल्या ‘कृष्णकुंज’ बंगल्याला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६:२० ते १० सप्टेंबर रोजी सकाळी ७:४५ या कालावधीत अज्ञात चोरांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कोयडा तोडून आत प्रवेश केला.
चोरांनी घरातून पितळी व तांब्याची भांडी, बाथरुममधील नळ आणि मिक्सर, चार्जिंगची बॅटरी, कपडे असा एकूण २१,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला आहे. १० सप्टेंबर रोजी दुपारी प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) सह ४५४, ४५७ आणि ३८० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









