खेडमध्ये किरकोळ वादातून तरुणाला दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- खेड शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील मुकादम लँडमार्क इमारतीजवळील किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला झाल्याची घटना १९ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात खलफान यासीर मनीयार (वय ३०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मनजुर दाभोळकर ( रा. सुखदर, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खलफान वासीर मनीयार (३०, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. खेड, पीरमोहल्ला, सफा मशिद चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या वेळी आरोपी मनजुर दाभोळकर हा फिर्यादीची आई जैतुस मनीयार आणि भाऊ कैफ मनीयार यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करत होता. ही माहिती कैफ मनीयार यांनी फोनवरून खलफान यांना दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

खलफान यांनी आई आणि भावाला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपी मनजुर दाभोळकर याने तेथे असलेला लाकडी दांडका उचलून खलफान यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात खलफान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खलफान यांच्या डोक्याला झालेली दुखापत ही आरोपी मनजुर दाभोळकर याने लाकडी दांडक्याने मारल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.