आंबडस येथे पिकअपसह तिघांना अटक
खेड:- खेड तालुक्यातील आंबडस बस स्टॉपजवळ कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत चार बैलांची सुटका करण्यात आली असून वाहनासह एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २९ डिसेंबर रोजी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सांगलीतील दोघांसह एका स्थानिक व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अशोक विठ्ठल मुंडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना आंबडस बस स्टॉपजवळ एक संशयास्पद बोलेरो पिकअप (एमएच ५० एन ५४७६) आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीच्या मागील हौद्यात चार लहान-मोठे बैल दाटीवाटीने आणि आखूड दोरीने क्रूरपणे बांधलेले आढळून आले. चौकशीदरम्यान, ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसल्याचेही उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांनी संजू राजू साळुंखे (वय ३१), रोहन अंकुश साळुंखे (वय २१, दोघेही रा. हिंगणगाव बुद्रुक, ता. कडेगाव, जि. सांगली) आणि संजय गंगाराम चव्हाण (वय ३४, रा. आंबडस बस स्टॉप जवळ, ता. खेड) या तिघांविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीची बोलेरो गाडी आणि १० हजार रुपये किमतीचे बैल असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अशोक मुंडे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(अ)(१) चे उल्लंघन, कलम ९, तसेच मोटर वाहन अधिनियम १९८८ आणि भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.









