Thursday, June 25, 2026
spot_img
Home शैक्षणिक खेडचा अनुराग वाघमोडे दहावीत राज्यात प्रथम

खेडचा अनुराग वाघमोडे दहावीत राज्यात प्रथम

खेड:- यंदाच्या दहावीच्या निकालात खेड तालुक्याने राज्यभरात मानाचा तुरा रोवला असून भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिराचा विद्यार्थी अनुराग महादेव वाघमोडे याने तब्बल १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अनुरागच्या या अभूतपूर्व यशामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्ञानदीप विद्यामंदिराने यंदाही आपल्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला साजेसा निकाल नोंदवत राज्याच्या गुणवत्ता यादीत ठसा उमटवला आहे. प्रशालेतील वृषभ दिगंबर देवघरकर याने ९९.६० टक्के गुणांसह राज्यात तृतीय क्रमांक मिळवला, तर दिशा दिलीप मोहिते हिने ९९.४० टक्के गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तसेच आर्यन बाळासाहेब भगत याने ९८.८० टक्के गुणांसह प्रशालेत चौथा तर शिवराज राजेश सूर्यवंशी याने ९८.४० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला आहे.

प्रशालेतील एकूण ४६ विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून तब्बल २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, ज्ञानदीप विद्यामंदिराने सलग २५ वर्षे शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयात वेदा दिनेश शिरीषकर हिने ९९ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत विषयात अनुराग महादेव वाघमोडे, वेदा दिनेश शिरीषकर, विश्वश्री रोहिदास केंद्रे आणि आर्या गजेंद्र बेंद्रे यांनी प्रत्येकी १०० गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. इंग्रजी विषयात अनुराग वाघमोडे याने ९८ गुण मिळवले. गणित विषयात वृषभ दिगंबर देवघरकर, दिशा दिलीप मोहिते, आर्य योगेश चिले आणि इंद्र संदेश पाटणे यांनी प्रत्येकी १०० गुण मिळवत विशेष प्रावीण्य मिळवले. विज्ञान आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयांत अनुराग वाघमोडे याने प्रत्येकी १०० गुण मिळवत सर्वांगीण गुणवत्ता सिद्ध केली.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार व पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट, मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक संतोष भोसले तसेच रागिणी जामकर, सुनील यादव, दिलीप मोहिते, विनोद टेंबे, महादेव वाघमोडे, संदेश जाधव, शांतीलाल आव्हाड आणि रामचंद्र भिंगारे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे तसेच संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, संस्था सदस्य रुपल पाटणे आणि ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.