रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गावर तालुक्यातील खानू येथे कंटेनरने मोटारीला धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले. संशयित कंटेनर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईलीयास अकबर हाजू (वय ४८, रा. हर्चे, शेलवाडी, ता. रत्नागिरी. सध्या रा. कुकुटपालन ता. लांजा, रत्नागिरी) असे संशयित कंटेनर चालकाचे नाव आहे. ही घटना १ जानेवारी २०२६ ला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खानू येथे हॉटेल देवभूमी पुढे मुंबई-गोवा महामार्गावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित ईलीयास हाजू हा कंटेनर (क्र. जीए -०५ टी ६०५३) घेऊन मुंबई गोवा महामार्गावरुन जात असताना खानू येथे हॉटेल देवभूमी येथे निष्काळजीपणे कंटेनर चालवून कंटेनरच्या पुढे जाणारी मोटार (क्र. एमएच-०५ सीएच ३१२३) ला मागील बाजूस ठोकर दिली. या अपघातात मोटारीमधील शौकत अल्लीसाहेब रखांगी (वय ५०, रा. कोंड्ये ता. लांजा) सईद नूर खान (वय ४०), दिलशाद रफिक नाईक (६५), सना सईद खान (३७), साकिब सईद खान ( १३ सर्व रा. लांजा) हे पाच जण जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार तृप्ती सावंतदेसाई यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मंगळवारी (ता. २७) ला संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









