खाण व्यवसायात भागीदारीचे अमिष दाखवत १२ लाख ७५ हजारांची फसवणूक

रत्नागिरी:- खाण व्यवसायासाठी भागीदारी देण्याचे अमिष दाखवून संशयितांनी १२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक मोहिते, नंदकुमार शिंदे (दोघेही रा. मुंबई ), संतोष चव्हाण (रा. खेडशी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ८ ऑक्टोबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत रत्नागिरी परिसरात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ. पद्मश्री प्रकाश कासार यांच्याघरी येऊन संशयित संतोष चव्हाण यांच्या मार्फत संदीप अशोक मोहिते व नंदकुमार शिंदे यांनी फिर्यादी कासार यांच्याशी ओळख करुन खाण व्यवसायाकरिता पद्मश्री कासार यांचा मुलगा प्रसाद याला भागिदारीचे देण्याचे अमिष दाखविले संशयितांनी दाखविले व तसे करारपत्र करुन घेऊन खाणीच्या कामासाठी संदीप अशोक मोहिते यांच्या बॅंक खात्यावर १० लाख ५० हजार रुपये तर नंदकुमार शिंदे याने ५५ हजार रुपये घेऊन काम न करता फिर्यादी महिला कासार यांची ११ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केली. रक्कम परत मागण्यासाठी फोन केला असता घरी येवून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सोबत असलेला संशयित संतोष चव्हाण याने फिर्यादी यांची १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सौ. पद्मश्री कासार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.