क्रांतीनगर तलवार हल्ला प्रकरणातील संशयिताला जामीन मंजूर

रत्नागिरी:- शहरातील क्रांतीनगर येथे तरूणावर तलवारीने वार करून जखमी  केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सौरभ अर्जून सावंत (32, रा़ नाचणे सुपलवाडी) असे या संशयिताचे नाव आहे़. सौरभ याच्यावर मुख्य आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

  गुरूनाथ उर्फ गोट्या प्रताप नाचणकर (26, रा़ मधलीवाडी मिरजोळे), सुशील सुनील रहाटे (33, रा़ कोळंबे सडा रत्नागिरी) अशी मुख्य आरोपींंची नावे आहेत़.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून एका तरूणावर तलवारीने वार करण्यात आले होते़. राजेंद्र शिवाजी विटकर (32, रा़ क्रांतीनगर रत्नागिरी) हा तरुण या घटनेत जखमी झाला होता. राजेंद्र याचा 6 जून रोजी दुपारी गुरूनाथ याच्यासोबत वाद झाला होता़. याचा राग मनात धरून गुरूनाथ व त्याच्यासोबत असलेल्या सुशील रहाटे यांनी क्रांतीनगर येथे राजेंद्र याच्यावर तलवारीने हातावर, पायावर वार केले़. या घटनेनंतर गुरूनाथ व त्याच्या साथीदाराने तेथून पळ काढला़. दरम्यान संशयित आरोपी हे सौरभ सावंत याच्या घरी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन संशयितांना मंगळवारी ताब्यात घेतले. या संशयितांना आश्रय दिल्याप्रकरणी सौरभ याच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.