कोसळणाऱ्या धबधब्यांवर वीज निर्मिती; चिपळूण कोळकेवाडीत प्रयोग

चिपळूण:- ऊर्जेची वाढती गरज आणि वीजनिर्मितीच्या मर्यादा पाहता, अपारंपरिक व पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने जलविद्युत प्रकल्पांची संख्या वाढविण्याची गरज आहे. पावसाळ्यात पश्चिम घाटातील अनेक छोटे-मोठे धबधबे चार ते सहा महिने काेसळत असतात. त्यावर हंगामी काळासाठी वीजनिर्मिती होऊ शकते. याचा प्रयोग चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडीत केला जात आहे

धबधब्यांवरून कोसळणाऱ्या पाण्याची उंची आणि वेगाचा योग्य वापर करून वीजनिर्मिती देशभरात शक्य आहे. अशा प्रकारच्या लघुजलविद्युत प्रकल्पात नैसर्गिक धबधब्यांच्या पाण्याचा उपयोग करून, टर्बाईन चालवून त्यातून वीज निर्माण करता येईल. धबधब्यांतून वीज निर्माण करणे, हा स्वस्त ऊर्जेचा स्रोत ठरू शकतो. दीर्घकालीन उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातही शक्य आहे.

सामान्यतः अशा प्रकल्पासाठी १० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीचा धबधबा उपयुक्त असतो. उंची जितकी अधिक, तितकी पाण्याची गती आणि दाब जास्त आणि त्यातून मिळणारी ऊर्जा अधिक. मात्र, अगदी ५ मीटर उंचीवरही, योग्य तांत्रिक नियोजनासह लहान प्रकल्प उभारता येतो.

साधारणत: २ हजार वॅट क्षमतेच्या यंत्रासाठी फक्त चार ते पाच लाख खर्च येतो. धबधब्यावरील प्रकल्प किती मोठा, यावर खर्च वाढू शकतो. तसेच बांधकामासाठी वेगळा खर्च येतो. असा प्रकल्प वर्षातून पावसाळ्यात पाच ते सहा महिने सुरू राहू शकतो. टर्बाईन व इतर यंत्रणा यांची नीट देखभाल केल्यास तो वर्षानुवर्षे कार्यरत राहत असल्याची माहिती ‘महा-जेनको’कडून देण्यात आली.

नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांनी लघुजलविद्युत प्रकल्पांत प्रयोगशीलता दाखवली आहे. महाराष्ट्रातही ऊर्जा विकास महामंडळ व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. १५ ते २० मीटर उंचीवरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून सहज वीज निर्माण करण्याचा प्रयोग चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडीत केला जात आहे.