३७ वर्षे पूर्ण; गणेशोत्सव, शिमगोत्सवात जादा गाड्यांचे नियोजन फलदायी
रत्नागिरी:- कोकण रेल्वेला २०२५-२६ आर्थिक वर्ष मध्ये १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. मागील अडीच वर्षांत कोकण रेल्वेने २० हजार ५९ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प मिळवले असून, सध्या २३ हजार ५५२ कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत, अशी माहिती कोकणे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने ३७ वर्षे पूर्ण करत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. या सोहळ्याला कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, संचालक सुनील गुप्ता, संचालक राजीव कुमार मिश्रा, मुख्य दक्षता अधिकारी अविनाश तरहावडेकर तसेच कोकण रेल्वे महिला सांस्कृतिक व सामाजिक सेवा संघटनेच्या अध्यक्षा मनीषा झा उपस्थित होत्या. कोकण रेल्वेच्या ३७ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सीएमडी संतोष कुमार झा यांनी कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे आणि योगदानाचे कौतुक केले. आर्थिक कामगिरी, कामकाज, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, प्रवासी सुविधा, मालवाहतूक आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील यंदाच्या यशाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रवासी सुविधांच्या विस्तारासाठी २०२६-२७ या वर्षाकरिता २०.७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुढील ५ वर्षांत सुमारे १०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये लिफ्ट, सरकते जिने, हाय-लेव्हल प्लॅटफॉर्म्स, प्लॅटफॉर्म विस्तार, स्पर्शक्षम टाइल्स, स्थानकांवर वातानुकूलित लाउंज आणि युपीआय पेमेंटसह अद्ययावत तिकीट सुविधांचा समावेश आहे. तसेच सर्व फूट ओव्हर ब्रिजेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करून २१ एफओबी ची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान कोकण रेल्वेने २४५ उन्हाळी स्पेशल, ३७९ गणपती स्पेशल आणि ५ एफटीआर स्पेशल गाड्या चालवल्या. तसेच लोटे येथील आरएससीएफच्या देखभाल व दुरुस्तीसाठी २४९ कोटी रुपयांचे ५ वर्षांचे कंत्राट मिळाले असून २-४ सप्टेंबर २०२६ पासून तेथे एलएचबी डब्यांची निर्मिती व ओव्हरहॉलिंग सुरू झाले आहे.
मालवाहतूक आणि कोल्ड साखळी योजना
वार्षिक २.६ दशलक्ष टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट कोकण रेल्वेने ठेवले आहे. तिकीट तपासणीतून १५.०४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, ज्यामध्ये विशेष मोहिमांमधून ६.२३ कोटी वसूल करण्यात आले. कोकण रेल्वे रत्नागिरी येथे कंटेनर सायडिंग आणि कोल्ड स्टोरेज विकसित करत आहे. आगामी वर्षात खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कुडाळ, झारप, मुर्देश्वर आणि मणकी स्थानकांवर कोल्ड-चेन सुविधा, वेर्णा, इंदापूर आणि रत्नागिरी येथे सायलो सुविधा, तर खेड, चिपळूण, रत्नागिरी व झारप येथे गोदामे उभारण्याची योजना आहे.









