Monday, October 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयगड ते तवसाळ खाडीत केबल स्टेड पुल उभारणीला वेग

जयगड ते तवसाळ खाडीत केबल स्टेड पुल उभारणीला वेग

रत्नागिरी:- सागरी महामार्गावरील रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यांना थेट जोडणाऱ्या जयगड-तवसाळ खाडीवर ७१५ कोटी रुपयांचा अत्याधुनिक केबल-स्टेड पूल वेगाने आकार घेत आहे. गुहागरच्या बाजुने या पुलाचे काम प्रगतीपथावर असून खाडी पात्रात आणि किनाऱ्यावर पुलाचे खांब उभे करण्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी पायलिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा पूल पूर्ण करण्यासाठी २०२८ पर्यंतची मूदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून ७१५ कोटी रुपये खर्चून जयगड-तवसाळ केबल-स्टेड पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल २.९ किलोमीटर लांबीचा आहे. पुलाचा खाडीच्या मधला मुख्य भाग अत्याधुनिक केबल-स्टेड पद्धतीचा असेल, ज्यामुळे खाडीतून जाणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. हा मुख्य पूल आणि त्याला जोडणारे जोड रस्ते ४ पदरी आहेत. तसेच मोठ्या जहाजांसाठी खाडीत पुरेशी उंची राखण्यात येणार आहे. एमएसआरडीसीच्या देखरेखीखाली या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सद्यस्थितीत खाडीच्या पात्रात आणि किनाऱ्यावर पुलाचे खांब उभे करण्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी पायलिंग प्रक्रिया प्रगत टप्प्यात आहे. केबल ज्या मुख्य उंच खांबांवर पेलल्या जाणार आहेत, त्या खांबांचे काँक्रिटीकरण आणि लोखंडी सांगाडे उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच जयगड आणि तवसाळ (गुहागर) बाजूने पुलाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसाठीचे मातीकाम व भूसंपादन अंतिम टप्प्यात आले असून, किनारपट्टी महामार्ग प्रकल्पांतर्गत साधारण ३० मीटर रुंदीच्या जमिनीच्या पट्ट्याचे (खाजगी व शासकीय जमिनी) संपादन करण्यात आले आहे.

दरम्यान, किनारपट्टीवरील पर्यावरण नियमांनुसार आणि कांदळवन क्षेत्रासाठी या प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना पर्यटकांसाठी विशेष पादचारी मार्ग ठेवण्यात येणार आहे. पुलाचे बांधकाम वेगाने सुरू असून, पुढील दोन वर्षांत म्हणजेच २०२८ च्या सुमारास हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

प्रवासाच्या वेळेत आणि अंतरात मोठी बचत

सध्या वाहनधारकांना जयगड ते तवसाळ जाण्यासाठी फेरी बोट सेवा वापरावी लागते. मात्र, रात्रीच्या वेळी वा हवामान खराब असताना ही सेवा बंद ठेवावी लागते. अशा वेळी चिपळूण किंवा लांजा मार्गे सुमारे ९० ते १०० किमीचा लांबचा वळसा घालून ३ ते ४ तास घालवावे लागतात. हा पूल पूर्ण झाल्यावर हा १०० किमीचा महाप्रवास थेट २.९ किलोमीटरवर येणार आहे. अवघ्या ५ ते १० मिनिटांत खाडी पार करता येईल आणि २४ तास अखंड वाहतूक सुरू राहिल्याने प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.