रत्नागिरी:- तालुक्याती कोतवडे येथे घरासमोरील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्या प्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 3 एप्रिल रोजी रात्री 8.20 वा. सुमारस घडली आहे.
मंगेश शांताराम बारगोडे, मनोज मंगेश बारगोडे (दोन्ही रा.कोतवडे उंबरवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अजित अशोक बारगोडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री ते जेवण झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात फिरत होते. त्यावेळी त्यांना समोरील घरा बाहेरील पाखाडीमध्ये मोठमोठ्याने भांडणाचा आवाज आला.
त्यामुळे त्याठिकाणी काय झाले ते पाहण्यासाठी अजित बारगोडे गेले असता त्यांना त्याठिकणी लोगडे व सौरभ बारगोडे भांडत असल्याचे दिसून आले. अजित बारगोडे यांनी त्या दोघांनाही बाजुला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट व बोलाचाली झाली. दरम्यान संशयित मंगेश बारगोडे आणि मनोज बारगोडे हे दोघेही तिथे आले. त्यातील मंगेशने हातात दगड घेउन फिर्यादी अजित बारगोडे यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तर मनोजने फिर्यादीचा भाउ आशिषला पाठीमागून मारुन झटापटीमध्ये मानेला उजव्या बाजुस चावा घेतला. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.