रत्नागिरीः– तालुक्यातील कोतवडे येथील दिलीप रामाणे यांच्या खूनातील संशयिताची सत्र न्यायालयाने 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. विनायक उर्फ नानू नारायण भोसले (50, रा भोसलेवाडी कोतवडे) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर कोतवडे येथील दिलीप रामाणे याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून नानू भोसले याला अटक करण्यात आली होती.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. गुन्ह्यातील माहितीनुसार, दिलीप रामचंद्र रामाणे (58, रा कोतवडे लावगणवाडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. दिलीप यांचा रक्ताने माखलेल्या स्थितीतील मृतदेह 17 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास कोतवडे कुंभारवाडी परिसरात आढळून आल्यानंतर कोतवडे गावात खळबळ उडाली होती. दिलीप याचा खून नेमका कुणी केला, याचा उलघडा होत नव्हता. अखेर 9 महिन्यानंतर नानू भोसले यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
नानू भासले याच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आरोपीला केवळ संशयाच्या आधारे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खूनाचा हेतू अद्याप पोलिसांकडून सांगण्यात आला नाही. आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्याच्यावर भावाची विधवा पत्नी व मुल यांचा भार आहे. आरोपीला जामीन दिल्यास पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले जाईल तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी शर्थीचे आरोपी पालन करेल तर सरकार पक्षाकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आरोपी याने दगड डोक्यात मारून खून केला असून हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आरोपीला दारूचे व्यसन असून जामिनावर सोडल्यास तो पळून जाईल तसेच साक्षीदार व पुराव्यांशी छेडछाड करू शकतो त्यामुळे जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली.
न्यायालयाने निकाल देताना सांगितले की, आरोपीविरूद्धचे दोषारोपपत्र न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहे. त्यानुसार एक साक्षीदार वगळता इतर कोणाजवळही आरोपी याने खूनाची कबुली दिलेली नाही. मयताला दारूचे व्यसन होते व तो दारू पिवून कुठेही पडून राहत होता व त्याची पत्नी त्याला घरी घेवून जात असे. सर्व परिस्थिती लक्षात घेता आरोपिविरूद्ध कोणताही ठोस प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे आरोपीला अनिश्चित काळासाठी कारागृहात ठेवणे योग्य ठरणार नाही, असे नोंदवत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.









