8 गुन्हे उघड, 44 ग्रॅम सोनं जप्त; एक आरोपी अटकेत, तीन फरार
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गवर स्लायडींग ला थांबणाऱ्या ट्रेन मधील प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात लोहमार्ग पोलीस – हार्बर विभागाला यश आले असून एका आरोपीच्या अहिल्यानगर येथून मुसक्या आवळण्यात आल्या तर उर्वरित 3 आरोपी अद्याप फरार आहेत. अटकेतील आरोपीला 10 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई लोहमार्ग पोलीस हार्बर विभागांतर्गत 25 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याची स्थापना झाली. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांकडील दागिने व पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
दिवाणखावली व शापे-बामणे या स्थानकांदरम्यान रेल्वे गाड्या क्रॉसिंगसाठी साईडला थांबवल्या जात असताना खुले खिडक्यांचा गैरफायदा घेत प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन तसेच खिडकीला लटकवलेल्या पर्स खेचून चोरी केल्याच्या एकूण ८ घटना रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद झाल्या.
या प्रकरणांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांनी चार जणांची टोळी उघडकीस आणली. त्यातील मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधव (रा. अहिल्यानगर)यास 30 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीकडून चौकशीत 44 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत ₹5 लाख 2 हजार इतकी आहे. तसेच चोरीस गेलेल्या तीन पर्स, त्यामधील आधार कार्ड, इतर कागदपत्रे, दोन मोबाईल फोन व किरकोळ साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.
तपासात उघड झाले की, आरोपी टोळी रेल्वे गाडी साईडला लागल्यानंतर अंधारात असलेल्या डब्यांजवळ थांबत असे. यावेळी एक आरोपी खाली बसून दुसरा आरोपी त्याच्या खांद्यावर उभा राहत असे, आणि खिडकीतून आत हात घालून झोपलेल्या प्रवाशांच्या गळ्यातील दागिने किंवा लटकवलेल्या पर्स खेचून चोरी करीत असे. बहुतांश घटना संध्याकाळी सातनंतर घडलेल्या आहेत.
यासंदर्भात माहिती देताना नीलिमा कुलकर्णी, सहाय्यक पोलीस आयुक्त (रेल्वे), हार्बर विभाग यांनी सांगितले की, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द सुमारे २६५किलोमीटरअसून, एकूण 27 रेल्वे स्थानके या कार्यक्षेत्रात येतात. मर्यादित मनुष्यबळ असूनही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
त्यांनी प्रवाशांना आवाहन केले की, प्रवासादरम्यान खिडक्या बंद ठेवाव्यात, मौल्यवान दागिने अंगावर घालणे टाळावे, पर्स व मौल्यवान वस्तू खिडकीला लटकवू नयेत, तसेच संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी.
गुन्ह्यातील उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. कोकण रेल्वे मार्गावर अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.









