कोयता घेऊन अंगावर धावल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कोंड्ये तर्फे सौंदळ येथे जनावरांनी भातशेतीची रोपे खाऊन नुकसान केल्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये तुफान वाद झाल्याची घटना समोर आली आहे. मोकाट सोडलेल्या पाड्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याचा जा विचारल्याच्या रागवरून एकाने कोयता घेऊन मारण्यासाठी अंगावर धाव घेतल्याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात ५५ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजल्यापासून ते २९ जुलै रोजी दुपारी ४:४५ वाजेच्या दरम्यान कोंड्ये तर्फे सौंदळ येथे हा प्रकार घडला. फिर्यादी अनंत तुकाराम शिवगण (वय ३८, रा. कोंड्ये मधलीवाडी) यांच्या शेतजमिनीशेजारीच आरोपी किशोर गणपत शिवगण (वय ५५, रा. कोंड्ये खालचीवाडी) यांची शेतजमीन आहे.
२८ जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी आपली शेतजमीन पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी किशोर शिवगण यांनी आपला काळ्या रंगाचा पाढा दावणीला न बांधता मोकाट सोडल्यामुळे त्याने फिर्यादीच्या भाताची रोपे खाऊन शेतीचे नुकसान केले होते. या गोष्टीचा जा विचारण्यासाठी २९ जुलै रोजी दुपारी पावणेपाचच्या सुमारास फिर्यादी अनंत शिवगण हे आरोपीच्या घरी गेले होते आणि परत येत असताना नामदेव पुजारी यांच्या घरासमोर त्यांना आरोपी आणि त्याची पत्नी भेटले.
फिर्यादीने त्यांना, “तुझ्या गुरांनी माझी भातशेती खाऊन नुकसान केले आहे, ते जरा बघायला चल,” असे म्हटले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याचा राग आल्याने आरोपी किशोर शिवगण याने हातात कोयता घेऊन फिर्यादी अनंत शिवगण यांना मारण्यासाठी अंगावर धाव घेतली.
या प्रकरणी अनंत तुकाराम शिवगण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२४, १३१ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.









