कुवारबाव बाजारपेठ वाचणार;  बाजारपेठेतून होणार उड्डाणपूल

मिऱ्या-नागपूर महामार्ग ; मंत्री सामंतांकडून दिलासा

रत्नागिरी:- मिऱ्या-नागरपूर महामार्गामध्ये उध्वस्त होणाऱ्या कुवारबाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठा दिलासा दिला आहे. या महामार्गाचे काम करताना कुवारबाव बाजारपेठेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजारपेठेतील दुकाने सद्यस्थितीप्रमाणेच राहतील. बाजारपेठेच्या ठिकाणी उड्डाणपूल निश्चित झाला असून त्याच्या खालून जाणारा अंतर्गत रस्ता तयार करण्यात यावा. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून काम करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सामंत म्हणाले, मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करत असताना कुवारबाव बाजारपेठेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. ज्या नागरिकांच्या जमिनी महामार्गासाठी संपादित केल्या जाणार आहेत, त्यांना त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यात याव्या. महामार्ग रुंदीकरणात कुवारबाव बाजारपेठ उदध्वस्त करण्याला स्थानिक व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होता. भूसंपादन प्रक्रिया देखील हाणून पाडण्यात आली. आमदार उदय सामंत यांच्याशी चर्चा करून ही बाजारपेठ वाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केल्यावर सामंत यांनी पुढाकार घेऊन याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र त्यातून काही समाधानकारक मार्ग निघाला नव्हता. अखेर पोलिस संरक्षण घेऊन भूसंपादन करण्यात आले. परंतु बाजारपेठ वाचावी यासाठी व्यापारी ठाम होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी त्यांची बैठक झाली. तेव्हा उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत कुवारबाव येथे उड्डाणपुलाचा निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

बैठकीला जिल्हा‍धिकारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आणि कुवारबाव बाजारपेठेतील नागरिक उपस्थित होते.