किरकोळ वादातून खंडाळ्यात तलवारीने वार 

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा येथे ट्रान्सपोर्ट कंपनीचे चलन जमा करण्यावरून एकच राडा झाला. किरकोळ वादाचा भडका उडाला आणि तलवार बाहेर काढून वार करण्यात आला. यात एकजण जखमी झाला असून एकाने स्वतः चा जीव वाचवला. 

योगेश अनंत सावंत (31, रा. सैतवडे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाटद खंडाळा येथे हा प्रकार घडला. संदेश पवार हा मनोज विचारे यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला आहे. ट्रान्सपोर्ट ऑफिस मध्ये गाड्यांच्या नोंदी घेणे व चालकांकडून चलन घेऊन जमा करण्याचे काम ते करतात. चालक योगेश सावंत याने चलन जमा केले नसल्याने संदेश याने फोन करून योगेश याला चलन जमा करण्यास सांगितले. 

या दरम्यान दोघांमध्ये फोनवर बाचाबाची झाली. योगेश याने चलन आणून देतो असे सांगितल्याने संदेश त्याची वाट पहात होता. त्याच्या सोबत अन्य तिघे देखील होते. या दरम्यान योगेश दुचाकीवरून आला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. अन्य तिघांनी ही झटापट सोडवली. यावेळी योगेश तिथून निघून गेला. थोड्या वेळाने योगेश परत आला. येताना त्याने शर्ट मधून आणलेली तलवार बाहेर काढत संदेशवर वार केला. संदेशने वार चुकवला मात्र त्याच्या डाव्या भूवईवर जखम झाली. योगेश पुन्हा वार करण्याच्या तयारीत असताना अंबादास शिरसाट याने योगेशला पकडले. यावेळी योगेश याने आंबादास यांच्यावर देखील तलवार उगारली. मात्र अंबादास यांनी वार चुकवला. चौघांनी स्वतःचा जीव वाचवत पळ काढला.या प्रकरणी जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.