Sunday, June 7, 2026
spot_img
Home गुन्हेगारी किरकोळ कारणातून सख्ख्या भावाकडून काठीने बेदम मारहाण

किरकोळ कारणातून सख्ख्या भावाकडून काठीने बेदम मारहाण

दापोली- केळशी येथील घटना

दापोली:- दापोली तालुक्यातील केळशी चिंचवळवाडी येथे किरकोळ कारणावरून सख्ख्या भावांनी एकमेकांवर हात उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या भावाने आपल्याच भावाला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी उमेश सदानंद खामकर (वय ३५, रा. केळशी चिंचवळवाडी) हे आपल्या घरी खोलीत झोपलेले होते. दरम्यान, त्यांचा सख्खा भाऊ समीर सदानंद खामकर (वय ४२) हा मद्यधुंद अवस्थेत हातात काठी घेऊन तिथे आला.

कोणतेही कारण नसताना समीरने फिर्यादी उमेश यांच्यावर काठीने हल्ला चढवला. त्याने उमेश यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला, डाव्या खांद्यावर, छातीवर आणि पायाच्या पोटरीवर काठीने जोरदार प्रहार केले. या मारहाणीत उमेश गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर ३ जून रोजी पहाटे २ वाजता फिर्यादी उमेश खामकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी समीर खामकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.