कारवांचीवाडी फाटा येथे अपघातप्रकरणी मोटारचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा येथे एसटी आणि मोटारीमध्ये अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मोटारीमधील प्रवाशांच्या दुखापतीस, एकाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या संशयित कारचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नमन दीपक अगरवाल (वय ३३, रा. दोस्ती पाईन, दोस्ती वेस्ट काउंटी, बालकुम ठाणे (वेस्ट) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) सकाळी साडेसहाच्या सुमारास कारवांचीवाडी फाटा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचालक रविकांत नानासाहेब मिसाळ हे बस घेऊन जाताना कारवांचीवाडी फाट्याच्या पुढे हातखंबाहून रत्नागिरीकडे येणाऱ्या मोटारीतील संशयित चालकाने कार निष्काळजीपणे विरुद्ध दिशेला नेऊन एसटी बसला ठोकर दिली. या अपघातात प्रवासी किशोर प्रकाश तांदळे (वय ३५, रा. साईश्रद्धा अपार्टमेंट पागझरे, ता. चिपळूण), सागर दीपक भादवे (३७, रा. चंपाषष्टी सोसायटी चेंबूर, मुंबई), रविकुमार नागारम (४४, रा. कालकन सोसायटी कासारवाडावली ठाणे-वेस्ट) यांच्या किरकोळ दुखापतीस तर विकास कोंडिबा नवसरे (रा. वाई सातारा, सध्या रा. अॅन्टॉप हिल मुंबई) यांच्या दुखापती व मृत्यूस कारणीभूत झाला. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल राजवैद्य यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.