खेड:- मुंबई- गोवा महामार्गावरील हॅपी पंजाबी ढाब्यासमोर ह्युंदाई क्रेटा कारने आज सोमवारी पहाटे ४ वाजता महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यामुळे कारमधील एक जण गंभीर जखमी झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी ह्युंदाई क्रेटा कारने (एम एच ४७ बी बी १५७७) महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला (जी जे २५ टी ९४०७) पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात सोमवारी पहाटे ४ वाजता सुमारास घडला.
या कारमधून प्रवास करणारे कदम हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रामचंद्र लक्ष्मण कदम (वय ६२, रा. बोरिवली) असे जखमीचे नाव आहे. ते मालवण वरून मुंबईच्या दिशेने जात होते. महाड येथे ते थांबणार होते. रात्री पडलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.