चिपळूण:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेत व्यवस्थापक असलेल्या 49 वर्षे इसमाचा ड्युटीवर जात असतानाच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चंद्रशेखर महादेव गराटे असं मृत्यू झालेल्या बँक अधिकाऱ्याचं नाव आहे.
चंद्रशेखर महादेव गराटे हे मुळचे चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आहेत. ते नेहमीप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेत येण्यासाठी प्रवास करत होते. यासाठी ते नेहमीप्रमाणे गुहागर शृंगारतळी मार्गे दाभोळ फेरी बोटीतून दाभोळ येथे येत होते. याच प्रवासादरम्यान त्यांना फेरीबोटीत असतानाच अचानक चक्कर आली, त्यानंतर त्यांना तात्काळ दाभोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आलं. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. ही सगळी घटना 29 डिसेंबर रोजी दहा ते साडेअकरा दरम्यान घडली. चंद्रशेखर गराटे यांच्या निधनाने गराटे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालक, व्यवस्थापन कर्मचाऱ्यांकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे.
गराटे यांच्या पश्चात माध्यमिक शिक्षिका असलेल्या पत्नी, एक मुलगी, आई-वडील, भाऊ आणि भावजय असा मोठा परिवार आहे. गराटे हे मनमिळावू व सहकार्य करणारे होते. त्यांची चार महिन्यांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दापोली तालुक्यातील दाभोळ येथील शाखेत बदली झाली होती. तेव्हापासून ते दाभोळ येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. या घटनेची नोंद दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास दाभोळ पोलीस करत आहेत.









