Friday, July 24, 2026
spot_img
Home खेड कशेडी बोगद्यासमोर अमोनिया गॅसचा टँकर पलटी

कशेडी बोगद्यासमोर अमोनिया गॅसचा टँकर पलटी

गॅसगळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला

खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगद्यासमोर गुरुवारी अमोनिया गॅस वाहून नेणारा एक टँकर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात टँकरमधून कोणतीही गॅसगळती झाली नाही, ज्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथून लोटे एमआयडीसीतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा हा टँकर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होता. कशेडी बोगद्यासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला.

अमोनिया गॅससारखे धोकादायक रसायन टँकरमध्ये असल्याने काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, टँकरची तपासणी केल्यानंतर गॅसगळती झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची पाहणी करण्यात आली तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले. या अपघातात चालक प्रेमप्रकाश भस्कळ पटेल यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, हा टँकर लोटे एमआयडीसीतील संबंधित कंपनीकडे जात असल्याने कंपनीचे सेफ्टी अधिकारी व प्रतिनिधीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.