चिपळूण :- शनिवारी सकाळी कोसळणाऱ्या पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावरून कळंबस्ते येथे टेम्पो ट्रॅव्हलर्स रस्त्याच्या बाजूस घसरून अपघात घडला. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुबई व अन्य भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येऊ लागले आहेत आज सकाळी एक टेम्पो ट्रॅव्हलर्स खारेपाटणकडे जात असताना अपघात झाला. महेश चंद्रकात कडू (वय 30 रा मुंबई) यांच्या मालकीची टेम्पो ट्रॅव्हलर्स (क्रमांक एम एच 01 सी आर 8578) ही चालक रोशन रमेश चव्हाण हे घेऊन नालासोपारा येथून खारेपाटण येथे निघाले होते. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या या गाडीतून रमेश संजय शेटये, अंकिता राजेश शेटये ,पूजा भिकू हलपते, विशाल विजय शिगवण, अंकिता अरुण शिर्के, योगेश जनार्दन पवार, काव्य विशाल चव्हाण, विद्या विजय चव्हाण, आरती विशाल चव्हाण , राहुल गजानन चव्हाण, संदीप गजानन चव्हाण, सचिन सीताराम पवार असे तेरा जण प्रवास करीत होते. रात्री दहा वाजता ते नालासोपारा येथून निघाले होते ते आज सकाळी चिपळूण कळंबस्ते येथे दाखल झाले.
चिपळूण मध्ये काल सायंकाळपासून पाऊस कोसळत होता. आज सकाळीही पाऊस कोसळत होता, त्यामुळे महामार्ग निसरडा झालेला आहे. वाशिष्ठी पुलाच्या मागे काही फुटावर चालकाने गाडीचा ब्रेक लावला असता गाडी घसरून डाव्या बाजूला कलंडली आणि अपघात झाला. यामध्ये चालकासह बारा जण प्रवाशी जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रवाशांचे नशीब बलवत्तर होते गाडी ज्या ठिकाणी घसरली त्या ठिकाणापासून काही फुटावर वाशिष्ठी पूल होता अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.









