कुंपण तोडून महिलेचा विनयभंग, एकाचा घेतला चावा
दापोली:- तालुक्यातील कलानगर (पो. वेळवी) येथे जमिनीच्या कुंपणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादात एका महिलेचा विनयभंग करण्यात आला असून, मध्यस्थी करणाऱ्या पुरुषांना काठीने मारहाण करत एकाचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी एकाच कुटुंबातील ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी श्रीमती भाग्यश्री भागोजी दाभोळकर (वय ५०) यांच्या भावाच्या मालकीच्या सर्व्हे नं. २९/१४/१५ मधील जमिनीवर पश्चिम बाजूला सिमेंट आणि तारेचे कुंपण घातलेले होते. शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून हे कुंपण तोडून नुकसान केले. जेव्हा भाग्यश्री दाभोळकर यांनी या नुकसानीबाबत विचारणा केली, तेव्हा मुख्य आरोपी दामोदर पवार याने त्यांना अश्लील शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता अंकुश, अमर आणि इंदू पवार यांनी फिर्यादीला हाताच्या बुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी फिर्यादीच्या मदतीला धावून आलेल्या मनिषा आंजर्लेकर, वनिता आंजर्लेकर आणि वहिणी प्रमिला इवलेकर यांनाही आरोपींनी सोडले नाही. आरोपी क्र. २ आणि ३ यांनी या महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला.
वादाची माहिती मिळताच फिर्यादीचे भाऊ अशोक, प्रकाश, उदय आणि भाचा ऋतिक इवलेकर घटनास्थळी आले. आरोपींनी त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी दामोदर पवार याने अशोक इवलेकर यांच्या पाठीवर काठीने प्रहार केला, तर ऋतिक इवलेकर याच्या उजव्या खांद्याखाली चावा घेऊन त्याला जखमी केले.
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपकाही आरोपींवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दामोदर श्रीपत पवार, अंकुश दामोदर पवार, अमर दामोदर पवार, इंदू हरिश्चंद्र पवार, चांगुणा दामोदर पवार आणि अंकिता अमर पवार या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
दापोली पोलिसांनी या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७९ (विनयभंग), १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ३५२, ३५१(२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.









