रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील सुतारवाडी येथे एका बंद घराला लक्ष्य करत चोरट्याने सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ४२,०००/- रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १९ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत सीताराम पेडामकर (वय ५२, शिक्षण १२वी, व्यवसाय शेती, गवंडीकाम, रा. सुर्वेकोंड सुतारवाडी, करजुवे, ता. संगमेश्वर) यांच्या बंद घराला चोरट्याने लक्ष्य केले. अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूचा सिमेंटचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून दरवाजा फोडला आणि त्यावाटे घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे दार उचकटून काढले.
कपाटात ठेवलेली १२,०००/- रुपये किमतीची, सुमारे ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तसेच ३०,०००/- रुपये रोख रक्कम चोरून नेली. घरफोडी प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.