दापोली:- तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे एका बंद घराचे पाठीमागील दार उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांच्या मयत आईचे हे दागिने असून याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष श्रीपत साळवी (वय ६३, रा. कांदिवली, मुंबई) हे सेवानिवृत्त असून त्यांचे करंजाणी दर्भाचीवाडी येथे मूळ घर आहे. २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या पूर्वी, फिर्यादी यांच्या राहत्या घराचे पाठीमागील दार उघडे असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने कपाटातील किंवा पेटीतील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्याने सुमारे ३ तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ, सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ असा एकूण १,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.
या चोरीबाबत संतोष साळवी यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेची नोंद १३ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास करण्यात आली. दापोली पोलीस या चोरीचा अधिक तपास करत असून परिसरात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.









