कमी व्याजदराने कर्ज देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

रत्नागिरी:- कमी व्याज दराने कर्ज मिळवून देण्याची बतावणी करत महिलेची सुमारे 27 हजार 655 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 3 मार्च ते 9 मार्च 2021 दरम्यान घडली आहे.

दिव्या आणि अंकित शर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात साक्षी दिनेश पवार (38,रा.सिध्दीविनायक नगर,रत्नागिरी)यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,या दोन संशयितांनी त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ग्लोबल ऑनलाईन फायनान्स सर्व्हिसेस मधून प्रतिवर्षी 6 टक्के व्याज दराने तीन लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले. संशयितांच्या आमिषाला बळी पडून साक्षी पवार यांनी प्रोसेसिंग फी,पॉलिसी,अ‍ॅडव्हान्स हफ्ता व जीएसटीच्या नावाखाली 27 हजार 655 रुपये ऑनलाईन भरले होते.परंतू त्यानंतर कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल कोकरे करत आहेत.