पावणेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त; दोन्ही संशयित कोल्हापूरचे
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे पाच जनावरांना बेकायदेशीर कत्तलीसाठी नेणाऱ्या कोल्हापूर येथील दोन संशयितांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांकडून जनावरांसह ४ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हंसराज विलास चांदणे (वय २९, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) व रामचंद्र साधू सोने (वय ४०, रा. आरुळ, शाहूवाडी, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. २०) पहाटे ५ वा. निवळी येथील ग्रीन पार्क हॉटेलच्या अलिकडील वळणावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी बेकायदेशीर पाच जनावरे कत्तलीसाठी नेण्यासाठी पिकअप् वाहनातून (एमएच-११-एजी-९३१०) सर्व गायी व पाड्यांना वेदना होतील असे नेले जात होते. वाहनाच्या कमी उंचीच्या रुंदीच्या हौद्यात गायी व पाड्यांना हालचाल करण्यास प्रतिबंध केला तसेच हौद्यातील गायी व पाड्यांच्या तोंडाला व शिंगाना अखंड नायलॉन रशीने बांधून त्यांना पुरेसे अन्न व पाणी न देता क्रुरतेने वागणूक केली. या प्रकरणी सागर प्रकाश कदम (वय ३१, रा. कदमवाडी, हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण व मोटार कायदा कलम अन्वये संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने संशयितांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. बी. कांबळे करत आहेत.