खेड:- तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील ॲक्वीला ऑरगनिक प्रा. लि. या कंपनीच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी करून १ लाख १६ हजार २५१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ६ एप्रिल २०२५ रोजी रात्री १.२१ ते २.०० वाजेच्या दरम्यान घडली. याबाबतची तक्रार कंपनीचे दत्तात्रय रामचंद्र वाघमोडे (वय ५७) यांनी खेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनच्या उत्तरेकडील व पश्चिमेकडील बंद असलेल्या स्लाइडिंग खिडक्या उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनमध्ये ठेवलेले इलेक्ट्रिकल नॉन एफ.एल.पी ग्लॅन्ड व एफ.एल.पी ग्लॅन्ड, लोडसेल वायर असा एकूण १ लाख १६ हजार २५१ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर केला, परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीचा नंबर स्पष्ट दिसत नाही.
खेड पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.