Sunday, June 21, 2026
spot_img
Home राजकीय ‘ऑपरेशन टायगर’ वर्षाचे 365 दिवस सुरूच राहणार: ना. सामंत

‘ऑपरेशन टायगर’ वर्षाचे 365 दिवस सुरूच राहणार: ना. सामंत

रत्नागिरी:- “राज्यात रोजच पक्षप्रवेश सुरू आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ला जर नंबर द्यायचे ठरवले, तर वर्षाचे ३६५ दिवस हे ऑपरेशन सुरूच राहील. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते सध्या आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश पाहायला मिळतील,” असा दावा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केला. रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरेंचे भाषण, राज ठाकरेंचे आवाहन आणि एमआयडीसीच्या पाणीप्रश्नावर सविस्तर भाष्य केले.

उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करताना ना. सामंत म्हणाले, "उद्धव ठाकरे पक्ष सोडून नेमके जाणार कुठे? काँग्रेसने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला. पहिली शिवसेना काँग्रेसने फोडली, तर भुजबळ साहेबांना बाहेर काढून दुसरी शिवसेना फोडण्याचे कामही काँग्रेसनेच केले. ज्या सावरकरांवर काँग्रेस प्रचंड टीका करते, आज त्यांच्याच मांडीवर उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत."

उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणाचा समाचार घेताना ते पुढे म्हणाले, “त्यांचे कालचे भाषण ऐकल्यानंतर उरलेली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होतेय की काय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘युबीटी’ची पूर्ण काँग्रेस झाली आहे, हे चार वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते; जे कालच्या भाषणातून सिद्ध झाले आहे. आता जर युबीटीच्या पक्षप्रमुखांना राजीनामा द्यायचा असेल, तर तो कार्यकर्त्यांना विचारून चालणार नाही, तर त्यासाठी त्यांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचीच परवानगी घ्यावी लागेल.”आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, "भास्कर जाधव यांनी मांडलेला मुद्दा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तोच आमचाही मूळ मुद्दा होता. बाह्य यंत्रणा काय करतात यापेक्षा पक्षातील अंतर्गत संवाद संपलेला आहे. काळाबरोबर आपण बदलले पाहिजे आणि लोकांशी संवाद ठेवला पाहिजे. भास्कर जाधव यांच्या मागणीचे जर पालन केले, तरच असलेली 'युबीटी' टिकेल, अन्यथा अवघड आहे." तसेच, 'कमळ ऑपरेशन म्हणजे कमळ हातात घेऊन फिरणार का?' असा खोचक सवालही त्यांनी युबीटीला केला.

राज ठाकरेंच्या आवाहनावर सूचक वक्तव्य
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनतेला आणि मतदारांना केलेल्या आवाहनावर बोलताना सामंत यांनी संयमी भूमिका घेतली. ते म्हणाले, “राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केले आहे, मात्र मतदार त्याला कितपत प्रतिसाद देतात हे भविष्यातच कळेल. २०१८ ला त्यांनी जो सल्ला दिला होता, तो २०१९ च्या निवडणुकीत पाळला गेला का? त्यामुळे पुढच्या निवडणुकीची वाट पाहूया. राज ठाकरेंचा सल्ला मतदार या निवडणुकीत पाळतात की नाही, हे जनताच ठरवेल.”

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोयनेचा पर्याय
जिल्ह्यातील एमआयडीसी आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उद्योगमंत्री म्हणाले, “पाण्याअभावी उद्योगधंदे बंद पडतील असे एक भीतीचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. पण पाऊस पडला नाही, हा उद्योगमंत्र्यांचा दोष आहे का? माणसाचे जीवनमान हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यभरात एमआयडीसीच्या निवासी भागात (रेसिडेन्शियल एरिया) पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे.” “माणसांना जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे पाणी दिले जाईल आणि सोबतच इंडस्ट्री देखील बंद पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. नैसर्गिक स्रोत आटले असतील तर एमआयडीसी त्यात थेट काही करू शकत नाही. परंतु, यावर मार्ग काढण्यासाठी मी राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांशी स्वतः बोलणार आहे. कोयना धरणातील काही पाणी सोडून त्यातून या समस्येवर काही ठोस मार्ग काढता येईल का, याची चाचपणी केली जाईल,” अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली.