एटीएम फोडणार्‍या आरोपीची न्यायालयासमोर कबुली; चांगल्या वर्तवणूकीच्या हमीवर सुटका

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव येथील एक्सीस बॅकेचे एटीएम फोडणार्‍या आरोपीने न्यायालयापुढे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली़ यावेळी न्यायालयाने त्याला दोन महिने दोन दिवस तुरूंगातील कालावधी हीच शिक्षा ग्राह्य धरली़ तसेच पहिलाच गुन्ह्याचा प्रयत्न असल्याने गुन्हेगार कायदा कलम 1958 नुसार आरोपीची चांगल्या वर्तवणूकीच्या हमीवर मुक्तता केली़.

आसिफ उस्मान डांगे (19, रा़ बत्तीस शिराळा सांगली) असे मुक्तता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे़ गुन्ह्यातील माहितीनुसार दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी पहाटे कुवारबाव येथील एक्सीस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना समोर आली होती़ यावेळी सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी आसिफ याला ताब्यात घेत़ त्याच्याविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले होते़ गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी केला़ 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणीकराव सातव यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला़ खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून 2 साक्षिदार तपासण्यात आले़  सरकारी पक्षाकडून अ‍ॅड़ प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले़ तर मदतनीस म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिले