उसने पैसे परत मागितले म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला

वडिलांसह मुलावर गुन्हा दाखल

खेड:- उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील मुरडे-शिंदेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी बाप-लेकावर भारतीय न्यायसंहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन परशुराम तटकरी (वय ३२, रा. भडगाव खोंडे) यांनी आरोपी निलेश बाबाराम खामकर याला २,००० रुपये उसने दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी सचिन हे ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास निलेशच्या घरी गेले होते.

​पैसे मागितले असता निलेश खामकर याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आणि सचिन यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वाद वाढत असतानाच निलेशचे वडील बाबाराम खामकर हे घरातील कोयता घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सचिन यांच्या डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने जोरदार वार केला. या हल्ल्यात सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.

​पतीला वाचवण्यासाठी सचिन यांची पत्नी प्रीती तटकरी या मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता, आरोपी बाबाराम खामकर याने त्यांनाही अश्लील शिवीगाळ केली आणि हाताने थापटाने मारहाण केली. जखमी सचिन तटकरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत सचिन तटकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी निलेश खामकर आणि बाबाराम खामकर या दोघांविरुद्ध कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे: