उद्यापासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु

ई पासची आवश्यकता नाही; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई:- २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नसल्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची धाव २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती.

गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतूक अंशत: असल्याचे समजते. तसेच टप्प्याटप्प्याने ही वाहतूक वाढविण्यात येणार आहे.