उघड्यावर कचरा फेकणाऱ्या ‘चिकन सेंटर्स’चे परवाने होणार रद्द

रत्नागिरी नगरपालिका ॲक्शन मोडवर

रत्नागिरी:- शहरातील अस्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने आता ‘कठोर’ पाऊल उचलले आहे. “ज्या चिकन सेंटरचा कचरा उघड्यावर आढळेल, त्यांचे परवाने थेट रद्द केले जातील,” असा कडक इशारा आरोग्य समिती सभापती राकेश ऊर्फ बाबा नागवेकर यांनी दिला आहे. नगरपालिकेच्या या निर्णयामुळे नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर रत्नागिरी शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, ठिकठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी जमा होत आहेत. अनेक चिकन सेंटर चालक कोंबड्यांचे टाकाऊ अवयव आणि कचरा उघड्यावर फेकून देतात. हा मांसजन्य कचरा खाण्यासाठी कुत्र्यांची टोळकी तिथे जमा होतात, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या सूचनेनुसार सभापतींनी तातडीने चिकन सेंटर धारकांची बैठक बोलावली होती.

व्हॉट्सॲपवरून होणार मॉनिटरिंग सभापतींच्या दालनात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला शहरातील २८ चिकन सेंटर चालक उपस्थित होते. या सर्वांना कचऱ्याची विल्हेवाट स्वतः योग्य रीतीने लावण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी विशेष व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता थेट परवाना रद्द करण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वच्छ रत्नागिरीसाठी संकल्प “शहराचे आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे,” असे ठाम प्रतिपादन सभापती बाबा नागवेकर यांनी यावेळी केले. या बैठकीला पाणी समिती सभापती निमेश नायर, गटनेते बाळू साळवी, ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर आणि आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे उपस्थित होते. नगरपालिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील अस्वच्छतेला लगाम बसेल आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा रत्नागिरीकर व्यक्त करत आहेत.