अपघात करून चालक पसार
दापोली:- तालुक्यातील साखळोली येथील तेलोबा मंदिरासमोरील रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव आणि बेजबाबदारपणे येणाऱ्या इको कारने अॅक्टिव्हा मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडवल्यानंतर इको कार चालक जखमींना रुग्णालयात सोडून स्वतःचे नाव-गाव न सांगता तेथून पसार झाला आहे.
या अपघातात शुभम सुभाष फडकले (वय २४ वर्षे, रा. फणसू उगवतवाडी, ता. दापोली) हा मयत झाला असून अमन संतोष खांबे (वय २१ वर्षे, रा. फणसू उगवतवाडी, ता. दापोली) हा जखमी झाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमन खांबे आणि त्याचा मावस भाऊ शुभम फडकले हे दोघे २० मे रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास दापोली येथून त्यांच्या मालकीच्या अॅक्टिव्हा डिलक्स मोटरसायकलवरून (क्र. MH 08 BL 8688) डबलसीट फणसू येथे जाण्यासाठी निघाले होते.
ते साखळोली तेलोबा मंदिरासमोरील रस्त्यावर आले असता, समोरून (साखळोलीकडून) येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या इको कारच्या (क्र. MH 05 FG 5795) अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणाने चालवून अॅक्टिव्हाला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये शुभम फडकले याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अमन खांबे हा जखमी झाला. अपघातानंतर संबंधित इको कार चालकाने जखमींना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पोलिसांना पुढील माहिती मिळण्याआधीच आणि आपले नाव-गाव न सांगता चालक तिथून गुपचूप निघून गेला.
याप्रकरणी अमन संतोष खांबे याने दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी २१ मे २०२६ रोजी रात्री ११:२१ वाजता अज्ञात इको कार चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०५, १०६ (२), १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, दापोली पोलीस फरार अज्ञात इको कार चालकाचा कसून शोध घेत आहेत.









