इंजिनिअरींग प्रवेशासाठी किमान गुणांची अट 5 टक्क्यांनी शिथील

ना. उदय सामंत; दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार फायदा

रत्नागिरी:- इंजिनिअरींग प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट 5 टक्क्यानी शिथील केली आहे. त्यामुळे सीईटीत किमान गुण आणि बारावीला किमान 45 टक्के गुण मिळणार्‍या विद्यार्थ्यालाही प्रवेश दिला जाईल. त्याचा फायदा परराज्यात जाणार्‍या सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

येथील शासकीय विश्रांगृहात बोलताना ते म्हणाले, इंजिनीरिंग पदवी शिक्षण घेणार्‍यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयात किमान 45 टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. पुर्वी ही अट अनुक्रमे 50 व 45 टक्के होती. नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत दिली आहे. याबाबतचे राजपत्र सरकारने प्रसिद्ध केले आहे. कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महारष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी होती. गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली नव्हती. इंजिनीअरिंग सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही 50 व 45 टक्क्यांवरून अनुक्रमे 45 व 40 टक्के अशी केली आहे. कमी गुण मिळालेले विद्यार्थी परराज्यात प्रवेश घेतात. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी आणि शासकीय कॉलेजमधील सुमारे 62 हजार पदे रिक्त राहत होती. नवीन निकषामुळे परराज्यात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटणार असून रिक्त राहणार्‍या 60 टक्के जागा भरल्या जातील.

‘उमेद’ अभियान बंद करून तेथील अधिकारी, कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्याबाबत कोणताही निर्णय  झालेला नाही. कर्मचार्‍यांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. उमेदमधून एकाही कर्मचार्‍याला कमी केले जाणार नाही. उमेदसाठी 100 कोटी गुंतवणूकीची योजना भविष्यात होणार आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांचे पगार करणारी संस्था बदलण्यात आली आहे. त्यांचे पगार कमी केलेले नाहीत. राज्यात 2,859 कर्मचारी कार्यरत आहेत. शासन निर्णयही जाहीर झाला आहे. उमेदच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले जाईल अशी अपेक्षा आमदार सामंत यांनी व्यक्त केली.