Thursday, October 22, 2026
spot_img
Home संगमेश्वर आर्थिक व्यवहार अन् प्रेमसंबंधातून प्रौढाचे अपहरण?

आर्थिक व्यवहार अन् प्रेमसंबंधातून प्रौढाचे अपहरण?

संगमेश्वर पोलिसांत अज्ञात आरोपीवर गुन्हा

संगमेश्वर:- घरून रागाने निघून गेलेल्या पतीचा गेल्या वर्षभरापासून शोध घेऊनही तो न सापडल्याने, आर्थिक व्यवहार तसेच महिलांसोबतच्या प्रेमसंबंधातून त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत पत्नीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल जाफर आंबेडकर (वय ४२, रा. सोनगिरी मुस्लिम मोहल्ला, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे दिनांक ६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता रागाने निघून गेले होते.
पती अचानक गायब झाल्याने त्यांच्या पत्नी फरहा बिलाल आंबेडकर (वय ३९) यांनी गेल्या वर्षभरापासून त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताच पत्ता लागला नाही. बिलाल आंबेडकर यांचे काही महिलांसोबत असलेले प्रेमसंबंध आणि त्यांचे आर्थिक व्यवहार या कारणांतूनच कोणत्या तरी अज्ञात इसमाने त्यांचे अपहरण करून त्यांना पळवून नेले असल्याचा संशय पत्नीने व्यक्त केला आहे.
वर्षभर शोध घेऊनही पती परत न आल्यामुळे अखेर फरहा आंबेडकर यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९:३६ वाजता गु.र.नं. १३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १४०(३) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध अपकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.