रत्नागिरी:-कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे बाधितांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्किल झाले आहे. मात्र पालिकेने दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंदिर येथील रनपचे रुग्णालय शुक्रवारपासून (ता. 23) कोविड सेंटर म्हणून सुरू केले जाणार आहे. सौम्य रुग्णांसाठीच्या 25 बेड (खाटा) येथे असणार आहेत. चार डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, औषधांचा योग्य साठा, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदींची व्यवस्था येथे करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नगराध्यक्ष बंड्या साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आरोग्य सभापती निमेश नायर आणि सर्व नगरसेवक आदींशी आजच चर्चा झाली. त्यांच्या आणि पालिकेच्या पुढाकाराने गरजेच्या वेळी हे कोविड सेंटर सुरू होत आहे. डॉ. कुंभारे, त्यांची पत्नी व अन्य चार डॉक्टर, चार नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती केली आहे. पुरेसा औषध साठाही केला आहे. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी लागणारे प्राथमिक तयार पूर्ण झाली आहे. त्यामुळे 25 बेडचे पालिकेचे कोविड सेंटर सुरू होणार आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर रुग्णांना काही सवलती देखील देण्याचा विचार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये कर्मचारी विभागले जाणार आहेत. पाणी, विजेची व्यवस्था, जनरेटर सुविधा उपलब्ध केली आहे. औषधे, इंजेक्शनसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची सुविधा केली आहे.
रुग्णालयात दाखल रुग्णांना दोन वेळा जेवण, सकाळी चहा, नाश्ता व सायंकाळचा चहा मोफत दिला जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा खर्च पालिका उचलणार असल्याचे समजते. रुग्णालयाच्या आवारात नातेवाइकांसाठी वेटिंग रुम किंवा बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्यातरी सौम्य रुग्णांसाठी हे सेंटर सुरू केले जाणार आहे.