Monday, October 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी आरोग्य मंदिर येथे पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक

आरोग्य मंदिर येथे पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक

दुचाकीस्वारावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर रस्त्यावरील आरोग्य मंदिर येथील लोटलीकर हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध पादचारी महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ६१ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दामले हायस्कूल शेजारील जोशी कंपाऊंड येथे राहणाऱ्या वंदना विठ्ठल आग्रे (वय ६१, रा. रत्नागिरी) या ३० सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास साळवी स्टॉप ते मारुती मंदिर रस्त्यावरील लोटलीकर हॉस्पिटलसमोरील रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी संशयित चालक साझेब फजल जहागीरदार (वय २५ वर्षे, मूळ रा. रूम नं. ४, इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, राजेंद्रनगर, सध्या रा. प्लॉट नं. १०१, बेर्डे प्लॉटिंग, नूतननगर, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची अ‍ॅक्सेस दुचाकी (क्रमांक एम.एच. ०८ ए.झेड. ११७२) घेऊन तेथून जात होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगात, हयगयीने व बेदरकारपणे चालवत रस्ता ओलांडणाऱ्या वंदना आग्रे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वंदना आग्रे या रस्त्यावर फेकल्या जाऊन त्यांना लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या.

या अपघाताप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ईशिता रूपेश वाडावे (बक्कल नंबर ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक साझेब फजल जहागीरदार याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.