Monday, October 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी कासारी गवाणवाडी येथे दुचाकी दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

कासारी गवाणवाडी येथे दुचाकी दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

दोन तरुण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील कासारी ते चाफेरी मार्गावर कासारी गवाणवाडी येथील उतारावर रविवारी रात्री दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या सिमेंटच्या संरक्षक कठड्यावर आदळून खोल दरीत कोसळल्याने चालक अनुप सत्यनारायण शर्मा (वय २०, रा. शिगनजोरी, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयत चालकाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले तिघे तरुण रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीवरून (क्रमांक एम.एच. ०८ ए.आर. ६९२०) कासारी ते चाफेरी मार्गे खंडाळा येथे जात होते. चालक अनुप शर्मा याने दुचाकीवर रूतिक शिवधनी पटेल (वय २३) आणि निरज कश्यप (वय २१) या दोघांना मागे बसवले होते. कासारी गवाणवाडी येथील तीव्र उतारावर दुचाकी आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व भरधाव वेगात चालवलेली दुचाकी रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर जोरदार आदळली. हा आघात इतका भीषण होता की दुचाकीसह तिघेही थेट खोल दरीमध्ये फेकले गेले. या अपघातात चालक अनुप याच्या डोक्याला व शरीराला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले रूतिक पटेल आणि निरज कश्यप हे दोघे लहान-मोठ्या दुखापती होऊन जखमी झाले.

अपघातानंतर जखमी रूतिक पटेल याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत चालक अनुप सत्यनारायण शर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १२८ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या भीषण अपघाताचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.