संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन नातलग गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून संगमेश्वर पोलिसांनी २० जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत परस्पर विरुद्ध फिर्यादी दाखल करण्यात आल्या.
फिर्यादी संदीप अनंत गुरव (३६, आरवली गुरववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचे नातेवाईक आपल्या वडिलोपार्जित जमिनीत जळाऊ लाकडे ठेवत असताना विलास जयसिंग गुरव आणि मनिषा विलास गुरव तेथे आले. त्यांनी फिर्यादींना जाब विचारला. यानंतर सर्व आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला चढवला. या घटनेत सागर, संदीप, महेंद्र आणि अमोल गुरव हे जखमी झाले आहेत.
संगमेश्वर पोलिसांनी सुभाष जयसिंग गुरव, अनिकेत सुभाष गुरव, शैलेश जयसिंग गुरव, प्रशांत विठ्ठल गुरव, प्रवीण विठ्ठल गुरव, विलास जयसिंग गुरव, मयुरी प्रविन गुरव, प्रितम प्रशांत गुरव, मनिषा विलास गुरव, सुप्रिया सुभाष गुरव, प्रियंका शैलेश गुरव, विजया विठ्ठल गुरव यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या गटाच्या विद्या विलास गुरव (४५, रा. आरवली गुरववाडी, ता. संगमेश्वर) यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दिलीप राजाराम गुरव, महेंद्र रामदास गुरव, आमोल रामदास गुरव, संदिप अनंत गुरव, सागर अनंत गुरव, केतकी संदिप गुरव आणि विक्षा आमोल गुरव (सर्व रा. आरवली गुरववाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही.डी. साळवी हे करीत आहेत.









