रत्नागिरी:- गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात येणार्या विशेषत: खासगी बसेसची तपासणी नियमितपणे आरटीओ अधिकार्यांकडून महामार्गावर सुरू आहे. त्याचप्रमाणे ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची (मद्यप्राशन करून वाहने चालवणे) कारवाई हाती घेण्यात आली आहे. पहिल्या दोन दिवसांत 18 खासगी बसेसवर कारवाई करून 1 लाख 30 हजारांचा दंड आरटीओंकडून करण्यात आला. नियमबाह्य काही त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी आरटीओ विभागाकडून देण्यात आली.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात हजारोंहून अधिक चाकरमानी मुंबई, पुण्यातून दाखल होत असतात. रेल्वे, खासगी वाहने, एसटी, खासगी बसेस हे चाकरमानी सोमवारी संध्याकाळपर्यंत दाखल झाले आहेत. तर गौरी गणपतीच्या सणाला अजूनही काही चाकरमानी येत आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव काळात विशेषत: खासगी बसेसधारकांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या.
आरटीओ विभागाने खासगी बसेसचे तिकीट दर निश्चित करून दिले असून त्यापेक्षा अधिक तिकीट दर आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार केल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आले होते. मात्र तिकीट दरवाढीबाबत कोणतीच तक्रार या कारवाईत नव्हती. खासगी बसेसची तपासणी करण्यात आली असता वाहन नियमबाह्य काही त्रुटी आढळल्याने या कारवाईत 18 खासगी बसेसवर 1 लाख 30 हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच वेग मर्यादा ओलांडणार्यांवरही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात पोलिस विभागाबरोबरच आरटीओ विभागही 24 तास गस्त पथकात काम करत आहे. ही तपासणी मोहीम गणेशोत्सव संपेपर्यंत 24 तास राबविण्यात आली आहे.