रत्नागिरी:- शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करत आठवडा बाजाराजवळ एका व्यक्तीला गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडले. मनोज मनोहर नाचणकर (५७, रा. तेली आळी, आठवडा बाजार, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील आठवडा बाजाराजवळील एका पडक्या इमारतीच्या बाजूला मोकळ्या जागेत आडोशाला एक व्यक्ती गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहवा. २५१ शांताराम रामचंद्र झोरे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे तात्काळ पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मनोज नाचणकर हा बेकायदेशीरपणे गांजाचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ च्या कलम ८ (अ), २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला २३ मे २०२५ रोजी रात्री १०.०५ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेमुळे रत्नागिरी शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या सेवनावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.