गुहागर:- गुहागर तालुक्यातील मोडकाआगर येथे एका दुर्दैवी अपघातात १ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. १३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आजारी बालकाला उपचारासाठी घेऊन जाणारी रिक्षा रस्त्यावरील गतिरोधकावरून उलटल्याने हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
धोपावे-कुळेवाडी येथील स्वरा कुळे यांचा १ वर्षांचा मुलगा स्वयंम सुरेंद्र कुळे हा आजारी असल्याने, त्याला उपचारासाठी कुटुंबातील महिला आणि परिसरातील काही जण शृंगारतळी येथील डॉ. ढेरे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले होते. डॉक्टरांनी बालकाची प्रकृती पाहून त्याला तातडीने गुहागर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार, कुटुंबातील सदस्य बालकाला घेऊन अनमोल भिकाजी शिरगावकर याच्या रिक्षातून (क्रमांक MH 03 A 7426) गुहागरच्या दिशेने निघाले होते. रात्री ८.३० च्या सुमारास ही रिक्षा मोडकाआगर धरणाजवळील पुलावर आली असता, रिक्षाचालकाने गाडी भरधाव वेगाने आणि हलगर्जीपणे चालवल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. परिणामी, गतिरोधकावरून रिक्षा उलटून हा भीषण अपघात घडला.
बालकाचा मृत्यू, तर इतर चार जण जखमी
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने गुहागर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी १ वर्षीय स्वयंम कुळे याला मृत घोषित केले. वैद्यकीय अहवालानुसार, बालकाचा मृत्यू ‘एस्पिरेशन न्यूमोनिटिस’ मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातात रिक्षात प्रवास करणाऱ्या रमिला रमेश कुळे (वय ४९), कविता किशोर माने (वय ४७), सुप्रिया सुरेश कुळे (वय ४६) यांच्यासह रिक्षाचालक अनमोल शिरगावकर हे देखील जखमी झाले असून, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी सुप्रिया सुरेश कुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, गुहागर पोलिसांनी १४ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. चालक अनमोल शिरगावकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेचा अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.









