Wednesday, June 10, 2026
spot_img
Home संगमेश्वर आजारपणाला कंटाळून कुरधुंडा येथील महिलेची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून कुरधुंडा येथील महिलेची आत्महत्या

पऱ्यात आढळला मृतदेह

संगमेश्वर:- तालुक्यातील कोळंबे बावनदी घाटीचा पऱ्या या ठिकाणी एका ५१ वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीमती सुगंधा बाळू खापरे (वय ५१, राहणार कुरधुंडा, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांनी दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुगंधा खापरे या गेल्या काही काळापासून मूळव्याध आणि कमरेच्या तीव्र आजाराने त्रस्त होत्या. सततच्या शारीरिक व्याधी आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्या मानसिक तणावात होत्या. १० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजल्यापासून ते ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. कोळंबे बावनदी घाटीचा पऱ्या येथे एका महिलेचा मृतदेह पाण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. आजारपणाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठीच त्यांनी पाण्यात उडी घेऊन आपले जीवन संपवले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ अन्वये या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कुरधुंडा गावातील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.